*भारतीय वास्तूरचनेचं शास्र डोळसपणे समजून घ्या - प्रसाद तारे.* येथील हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालयातील युवा पर्यटन मंडळातर्फे पुणे येथील सुप्रसिद्ध इतिहास तज्न मा. सतीश तारे यांचे शनिवार दि.२३ डिसेंबर रोजी बहुउद्देशीय सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी तारे यांनी भारतीय वास्तूरचना आणि महाराष्ट्र या विषयावर सखोल आणि चिकित्सक वृत्तीने भाष्य केले. भारतीय वास्तूरचनेचे महत्व, कोणार्क मंदिरापासून ते तंजावर आणि वेल्लोर पर्यंतची वास्तू शैली समोर ठेवत उदाहरणांसह विविध पैलू आणि शास्त्रीय दृष्टिकोन समोर ठेवत त्यांनी ओघवत्या शैलीत स्पष्ट केले.या वेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. तब्बल सव्वा तास महाविद्यालयीन युवकांशी संवाद साधत त्यानी सभागृहातील वातावरण मंत्रमुग्ध केले.पाषाणातील बांधकाम, त्यामागची संस्कृती,शैली, विचार, तत्कालीन राजवटींच्या पाऊलखुणा यांचा सहसंबंध त्यांनी स्पष्ट केला.प्रागैतिहासिक काळापासून वास्तूरचना कशाप्रकारे विकसित होत गेल्या, पाषाणातून केवळ छन्नी- हातोडीच्या आधारे निर्माण केलेल्या गुहा ते परिपूर्ण, देखण्या व वैभवशाली मंदिरापर्यंतचा प्रवास त्यांनी खुमासदार शैलीत उलगडत नेला.विविध राजवटीच्या प्रभावामुळे तसेच भौगोलिक स्थानामुळे मंदिरांच्या रचनेवर होत जाणारा परिणाम त्यांनी गोपूर या संकल्पनेसह स्पष्ट केला. त्या काळात आधुनिक साधनं उपलब्ध नसतानाही अवजड दगड मंदिराच्या बांधकामासाठी उंचावर वाहून नेणे, समूह नियोजन, व्यवस्थापन व त्यातील सुनियोजित पणा या बाबींचा प्रामुख्याने उल्लेख केला. मंदिराच्या बांधकामातील बारकावे कोरीव काम, प्रतिकात्मक हत्ती निवडण्यामागची कारणमीमांसा स्पष्ट केली. कोणार्क मंदिराचा दाखला देत त्या काळी आधुनिक विज्ञान संपर्क नसतानाही कर्कवृत्त, अक्षवृत्त, रेखावृत्त या माहितीच्या आधारे सुर्याच्या भासमान परिभ्रमणाचा सखोल विचार करून तेथील चक्रात्मक घड्याळं अचूक वेळ कशी दर्शवतात याची सखोल माहिती त्यांनी दिली. येथील प्रत्यक्षात पाषाणातील असणारं हुबेहूब लाकडासारखं दृष्यमान भासणारं चक्र व त्यापाठीमागील कलात्मक दृष्टीकोन त्यांनी स्पष्ट केला.कैलास लेणी वरुन खाली कशा पद्धतीने कोरल्या, महाराष्ट्रातील जमीनीखालील आठ मजली मंदिराचा उल्लेख व त्यापाठीमागचं तंत्रज्ञान याचाही त्यांनी परामर्ष घेतला. विशेषत्वाने त्यांनी एक गोष्ट नमूद केली की जगभरातील पाषाणात जेवढं रचनात्मक बांधकाम झालंय त्यापैकी ८० टक्के हे भारतात झालंय आणिक भारतातील या बांधकामापैकी ८० टक्के काम हे महाराष्ट्रातील आहे! आपल्या ओघवत्या भाषण शैलीत त्यांनी परकीय आक्रमणापासून बचाव करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची दुरदृष्टी आणि युद्धनीती, सपाट भूभागावरील तसेच उंचावरील किल्ले बांधकामांची गरज, त्यापाठीमागील शास्त्र,समुद्राच्या पाण्यात किल्ले सिंधुदुर्ग सारखी निर्मिती या बाबींचा विशेष उल्लेख केला. त्याचबरोबरीने दक्षिण भारतातील तंजावर आणि वेल्लोर येथील महाराजांच्या नावाने असलेला शिलालेख आणि त्याचं महत्त्व अधोरेखित केले.तत्कालीन कागदपत्रे, महाराजांच्या शत्रूकडूनही महाराजांबद्दल करण्यात आलेलं कौतुक व गौरवोद्गार यांची कारणमीमांसा केली. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावीत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात या निमित्ताने मौर्य,गुप्त, सातवाहन,चौल,चालुक्य, यादव अशा विविध राजवटीत निर्माण झालेल्या सांस्कृतिक, सामाजिक, वैचारिक, संक्रमणाचा आकृतीबंध तसेच त्याचा स्थापत्य कलेशी असणारा सहसंबंध स्पष्ट केला. तत्कालीन राजवटीत विविध बांधकामाच्या निमित्ताने दिला जाणारा राजाश्रय व भौगोलिक परिस्थिती व परंपरा यानुसार स्थापत्यशास्त्रात होत गेलेली संक्रमणे त्याचबरोबरीने या शास्त्रातील संशोधक वृत्तीचे महत्व अधोरेखित केले. सुरवातीला प्रमुख अतिथी मा.प्रसाद तारे यांचं हिस्ट्री एक्स्पिडीशन या माध्यमातून चालणारं काम यासंबंधीची माहिती तसेच त्यांचा परिचय प्रा. मंदार वैद्य यांनी करून दिला.या प्रसंगी पर्यवेक्षक प्रा. गिरीश पाखरे,प्रा. डॉ.राजू रिक्कल ,प्रा.डॉ. सुजित कुमावत, प्रबंधक अशोक असेरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ.नवनाथ भोंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील युवा पर्यटन मंडळातील सर्व सदस्य,कला, वाणिज्य आणि शास्त्र शाखेतील प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.
© Copyright @2023 | Designed by National Informatics Centre